सौ. सुविधा हरीचंद्र शिर्के
मुख्याध्यापिका – पूर्व प्राथमिक विभाग
स्मृतींची फुले रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित बाल विकास विद्या मंदिर ही शाळा मी कु. सुरेखा अनंत मावळंकर आताची सौ. सुविधा ह शिर्के यांचे बालपणापासूनचे घनिष्ठ नाते आहे. माझे इयत्ता ४ थी पर्यंत चे शिक्षण याच शाळेत मुख्याध्यापिका सौ. मुळये बाई, सौ. श्रद्धा सावंत बाई सौ. स्मिता चव्हाण बाई, यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. मला अजूनही शाळेचे दिवस आठवतात शाळेत कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी पताक्यांची सजावट करत असू, छान छान रांगोळी काढली जाई. सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा हस्तलिखित असो मी त्यामध्ये सहभागी होत असे. त्यावेळी आपली शाळा- ४थी पर्यंतच असल्यामुळे पुढील शिक्षण अरविंद गंडभीर हायस्कूलमध्ये झाले.सहाजिकच शाळेचे संस्थापक कै. प्र. रा. विश्वासराव ( रावगुरुजी), कै. वि. ना. शिंदे (भाऊ), कै. द. गो. पालकर गुरुजी या त्रिमूर्तींना लहानपणापासून मी अगदी जवळून पाहिलेले आहे.
जून १९८८ मध्ये या शाळेत भाऊ, रावगुरुजी व शिंदेबाई यांनी माझी नेमणूक पूर्व प्राथमिक विभागात शिक्षिका म्हणून केली. त्यावेळी विद्यार्थांची संख्या खूप होती. प्रवेशाच्या आधी २ दिवस पालक रांगा लावत तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसे त्यामुळे मग नेते मंडळींच्या मंत्र्याच्या चिठ्या आणत व तरीही जागे अभावी काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्यामुळे पालक नाराज होत असत.
जून मध्ये शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांना बघण्यासाठी येत असत. वर्गात येवून विद्यार्थ्यांना नाव विचारत. काही विद्यार्थी रडत असत. त्यांना वर्गशिक्षिका शांत कशा करतात हे पाहत. शिकविताना सुद्धा वर्गात येऊन उभे राहत.
वेळोवेळी पालकसभा घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल पाहिला जाई. हस्ताक्षराकडे तर रावगुरुजींचे कटाक्षाने लक्ष असे. परीक्षा झाली की कमिटीतील सर्व पदाधिकारी ते सर्व उत्तरपत्रिका पाहत असत. विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका वर्गशिक्षिकेला दाखवून त्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा तशी चूक होऊ नये याची काळजी घेण्यास सांगत. हे सर्व पाहून मी या विद्यार्थ्यांमध्येच रमून गेले.
मुख्याध्यापिका शिंदेबाईं, रावबाई, काळेबाई, सांडेबाई, बनेबाई या सहशिक्षिका व पांगेमाई, मोरेमाई, या सेविका म्हणून कार्यरत होत्या.
पूर्व प्राथमिक विभागात लिपिक नसल्यामुळे सर्व कामे शिक्षिका स्वत: करत व अजूनही करतात. कमिटीतील सर्व पदाधिकारी सुट्टीच्या दिवशी तर शाळेच्या कामात मग्न असत. मी सुद्धा काही वेळेला सुट्टीच्या दिवशी त्यांच्या बरोबर उपस्थित राहत असे. आमच्या विभागाचा जमाखर्च न चुकता कसा लिहायचा ते मी श्री. माधवसरांकडूनच शिकले.
शाळेच्या प्रगतीसाठी सर्व शिक्षकांना नामांकित शाळेत पाठवून अभ्यासाविषयी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी काही माहिती मिळवता आली तर त्यासाठी प्रयत्न केले जात.
आमचा पूर्व प्राथमिक विभाग हा शासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित असल्यामुळे मुख्याध्यापिका शिंदेबाई पासून सर्व शिक्षिका व सेविका यांनी संस्थेद्वारे मिळणाऱ्या अगदी अल्प वेतनात काम करून आपली शाळा माझी शाळा असे समजून काम केले आहे. आम्ही देणगी रूपाने काही देऊ शकलो नाही परंतु आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेला वेळ व केलेले काम हिच मोठी देणगी संस्थेसाठी व शाळेसाठी ठरेल असे मला वाटते.
विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल व शिक्षकांच्या आवडलेल्या कामाबद्दल रावगुरुजींची शब्बास! छान! ही पोचपावती मिळायची ती मी कधीही विसरू शकणार नाही.
बाल विकास विद्या मंदिर (पूर्व प्राथमिक विभाग ) आमच्या शाळेत वर्गखोल्या दोन असून विद्यार्थ्यांची पटसंख्या ५५ आहे. पूर्व प्राथमिक विभागात सगळे सण साजरे केले जातात. त्यातूनच बालमनावर आपली संस्कृती, परंपरा व मूल्ये रुजवली जातात. सन २०२४-२५ सालात संस्कृत श्लोक पाठात १४ विध्यार्थी स्पर्धेला गेलेली. ८ विद्यार्थाची निवड झाली.
विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले की शालेय कमिटीचे सर्व पदाधिकारी अगदी आवडीने उपस्थित राहत असत. पाहुण्यांची ओळख कशी करून देणार याची रंगीत तालिम शिक्षिकांकडून भाऊ स्वत: करून घेत असत. आम्हाला वेळ नाही तुम्हीच करून घ्या हे शब्द आम्ही त्यांच्या कडून कधीच ऐकलेले नाहीत.
मुख्याध्यापिका शिंदेबाई निवृत्त झाल्यानंतर सौ. भावसारबाई मुख्याध्यापक पदावर तीन वर्ष होत्या. त्यांच्यानंतर सौ. शिंदेबाई यांनी २ वर्षे मुख्याध्यापिका म्हणून काम पहिले व त्यांच्या निवृत्तीनंतर सौ. बनेबाई यांची नेमणूक मुख्याध्यापिका म्हणून झाली त्यांचेही विद्यार्थ्यांच्या अक्षर लेखनाकडे, कलागुणांकडे जास्त लक्ष असे. विद्यार्थ्यांना खाऊ बनवून वाटायचा असेल तर त्यांची खूपच घाई असे. तो पदार्थ व्यवस्थित, छान कसा करता येईल याकडे त्या पूर्ण लक्ष देत असत. शिंदेबाईं पासून मुलांना खाऊ बनवून देण्याची परंपरा अजूनही चालू ठेवली आहे.
मी स्वत: सौ. सुविधा हरीचंद्र शिर्के या शाळेची विद्यार्थिनी, पालक, शिक्षिका व मुख्याध्यापिका या सर्व भूमिका पार पाडल्यामुळे म्हणजेच सागरात पोह्ण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची ही संधी नव्या क्षितीजांना साद घालताना जुन्या क्षितीजांना अभिवादन करणे त्यांचे आशीर्वाद घेणे हिच आपली संस्कृती. या संस्कृतीची पाईक असणारी मी ही स्मृतीची फुले मनात साठवत माजी विद्यार्थिनी म्हणून व पूर्व प्राथमिक विभागाची मुख्याध्यापिका म्हणून ज्ञात अज्ञात व्यक्तींना अभिवादन करते व शाळेची उत्तोरोत्तर प्रगती होवो हिच शुभेच्छा देते.
सौ. नेत्रा दळवी
मुख्याध्यापिका – प्राथमिक विभाग
शिक्षक आणि विद्यार्थी विकासमाझा आणि बाल विकास विद्या मंदिर जोगेश्वरी (पूर्व) या माझ्या शाळेचा ऋणानुबंध जवळजवळ ३६ वर्षांचा आहे. शाळेची स्थापना रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित या संस्थेने केली. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागात ही शैक्षणिक संस्था ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहे.रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित बाल विकास विद्या मंदिर या मराठी शाळेत सर्व थरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. शाळेतील शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारे असावे त्यासाठी शाळा विविध सहशालेय उपक्रम राबवते. आषाढी एकादशी निमित्त दिंडी, सरस्वती पूजन, वाचन प्रेरणा दिन, हळदीकुंकू समारंभ, बालदिन, सामुदायिक वाढदिवस, शिवजन्मोत्सव, मराठी राजभाषा दिन, आजी-आजोबा कृतज्ञता सोहळा, वार्षिक स्नेहसंमेलन असे विविध उपक्रम शाळेत राबविले जातात. राष्ट्रीय सण साजरे केले जातात.
शाळेत सुसज्ज असे संगणक कक्ष आहेत. ई-लर्निंग ची सोय आहे. संगीत स्वर साधना विद्यालय, नृत्यवर्ग, कराटेचे वर्ग चालविले जातात. कबड्डी, खो-खो, लेझीम, संचलन, कवायत इत्यादींचे मार्गदर्शन केले जाते. दरवर्षी शाळेत क्रीडा महोत्सव साजरा केला जातो. सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू आहेत. आता इयत्ता पहिली पासून सी.बी.एस.ई चे शिक्षण दिले जाणार आहे.
बाल विकास शाळेमध्ये बालकांचा विकास होताना दिसत आहे त्याचबरोबर शिक्षकांचाही विकास होताना दिसत आहे. शाळेतील बरेच शिक्षक शिक्षणाचे कार्य करता करता मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचले. शिक्षण भारतीय संस्थेतर्फे बऱ्याच शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले. रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित या शैक्षणिक संस्थेतर्फे अनेक शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. माजी मुख्याध्यापिका सौ. वैशाली मुळये मॅडम, संध्या सावंत मॅडम यांनी आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार मिळवला. तर महाराष्ट्र शासन विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये सौ विशाखा तांबे मॅडम यांनी मुंबई जिल्हा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. असे आमचे शिक्षक प्रगतीपथावर आहेत.
अशा या उपक्रमशील शिक्षकांमुळे शाळा व संस्था यापुढे ही प्रगतीपथावर नक्कीच राहील. तसेच सुरक्षित व आनंदायी वातावरणात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, तंत्रस्नेही विद्यार्थी घडविणे हे शाळेचे मुख्य ध्येय साध्य होईल.
शाळेची व संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा.
धन्यवाद
श्री. जगदीश म सूर्यवंशी
मुख्याध्यापक – माध्यमिक विभाग
२०२२-२०२३ या वर्षात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई संस्थेचा हिरक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे ही फार अभिमानास्पद बाब आहे. या संस्थेने चालविलेली बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी (पूर्व) ही जागतिक शहर असलेल्या मुंबई उपनगरातील एक अग्रगण्य शाळा आहे आज मी जिथे येऊन पोहोचलो आहे. त्यावरून माझी परीक्षा करू नका, तर मी कोठून आलो आहे ते लक्षात घ्या.एका दुर्गम खेडेगावात माझा जन्म झाला, बालपणात कधीच पायात चप्पल किंवा बूट घालायला मिळाले नाहीत, कॉलेजला गेल्यावर पहिल्यांदाच चप्पल घालणारा मी या शाळेच्या मुख्याध्यापक होण्याचे भाग्य लाभले याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
I can do thing, you can not
You can do things I can not
But together we can do great things हे सार्थ ठरेल.
संस्था प्रमुखांनी काळाची गरज ओळखून RJMDS’s इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली आणि सतत १००% निकालाची परंपरा कायम सुरु आहे. पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध उपक्रम संस्थेतर्फे शाळा राबवत आहे जसे NTS, NMMS शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, ज्ञानपीठ , होमी भाभा, बालवैज्ञानिक, चित्रकला, ग्रेड परीक्षा, विविध क्रीडा खेळ, लेझीम, मल्लखांब, कराटे, योगा, नाट्य, संगीत, विज्ञान प्रदर्शन हस्तकला, रांगोळी प्रदर्शन इत्यादी राष्ट्रीय सण, समारंभ, महापुरुषांच्या जयंत्या, व्याख्याने, परिसंवाद इत्यादीचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जातो, त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
शाळा एक समाज आहे त्यासाठी शाळेत पालकांसाठी वाचनालय उपलब्ध करून दिलेले आहे. त्यातून वाचन पेटी, वाचक – बालक – पालक ही संकल्पना मूळ धरत आहे. आदर्श माता सन्मान पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श विद्यार्थी सन्मान करून गौरविण्यात येते, त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना प्रोत्साहन मिळत आहे. शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्मार्ट क्लासरूम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थायांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
एखादा संत दीप लावून जातो
त्याचा प्रकाश
अंधारातून वाट काढणाऱ्या जीवांना ……
मार्ग दाखवित राहतो!
अशा सदगुणी कार्यकारी मंडळानी बहुजनांच्या लेकरांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली आहेत. त्यांच्या हातात शिक्षणाचा दीप देवून प्रकाशाच्या वाटेवर चालण्याची चेतना निर्माण करत आहेत. भविष्यात संस्थेचे एक प्रचंड मोठे शैक्षणिक संकुल उभे राहून त्यात स्वच्छंदी, स्वाभिमानी, राष्ट्राभिमानी, उद्योजक, व्यावसायिक , तंत्रज्ञ, वैज्ञानिक, समाजसेवक निर्माण होऊन एकाच बागेत विविध रंगीबेरंगी फुले फुललेली पाहायला मिळतील याची मला खात्री आहे. त्यासाठी संस्थेच्या आणि शाळेच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
प्राचार्य, शिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी
शाळेच्या प्रगतीसाठी व सर्व वर्गाच्या चांगल्या निकालासाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम शाळेत राबविले जातात. या सर्वांचा परिणाम म्हणजेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.
शाळेत सर्व वर्गाच्या अध्यापनासाठी कुशल व प्रशिक्षित शिक्षक आहेत. त्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे शाळेचा निकाल हा उत्तरोतर उंचावत जात आहे. याचाच परिणाम म्हणजे फेब्रुवारी-मार्च २०२५ चा शाळांत परीक्षेचा निकाल हा १००% लागलेला आहे, अभ्यासात हुशार व कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळया गरजा त्यांच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन केले जाते.



वारंवार घेतला जाणारा सराव व त्याच सरावामुळे विद्यार्थ्यांचा निकाल उंचावण्यास मदत होते, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत गुणांचा विकास करण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शक मोलाचे ठरते याच मार्गदर्शनामुळे शाळेची प्रगती होत असते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांमुळे व संस्थेमुळेच बाल विकास ही शाळा मुंबई उपनगरातील एक नामांकित शाळा आहे.
शाळेतील सर्व कर्मचारी हे खेळमेळींच्या वातावरणात आपापले काम करत असल्यामुळे शाळेचे दैनंदिन काम सुरळीत चालत असते. एकूणच कर्मचाऱ्यांचे काम हे अभ्यासपूरक वातावरण राखण्यास मदत करते.

