हीरक महोत्सव २०२६-२७

६० वर्षांची गौरवगाथा!

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज संचालित बालविकास विद्या मंदिराचा हीरक महोत्सव दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता शाळेच्या मैदानात मोठ्या दिमाखात.

शिक्षकांच्या योगदानाचा भव्य गौरव; संस्थेच्या वेबसाईटचे लोकार्पण, हीरक महोत्सवी स्मृतीचिन्हाचे अनावरण.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई संचालित बालविकास विद्यामंदिर, जोगेश्वरीच्या सहा दशकांच्या गौरवशाली शैक्षणिक वाटचालीचा हीरक महोत्सव समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचा गौरव आणि संस्थेच्या भविष्यातील वाटचालीचा संकल्प यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई संचालित बालविकास विद्यामंदिर, जोगेश्वरीच्या सहा दशकांच्या गौरवशाली शैक्षणिक वाटचालीचा हीरक महोत्सव समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचा गौरव आणि संस्थेच्या भविष्यातील वाटचालीचा संकल्प यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

या भव्य सोहळ्यास मुंबईचे उपमहापौर मा. संजय घाडी, स्थानिक आमदार मा. अनंत (बाळा) नर आणि नगरसेविका श्रीमती नाजिया अब्दुल जब्बार सोफी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. प्रमुख पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी आरएसपीच्या माध्यमातून शानदार मानवंदना देत आणि लेझीम पथकाच्या आकर्षक सादरीकरणातून जल्लोषात स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने आणि लेझीमच्या तालबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज संस्थेच्या rjmdsmumbai.in या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच हीरक महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या स्मृतीचिन्हाचे अनावरण उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्या हस्ते करण्यात आले.

व्यासपीठावर मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुमधुर स्वागतगीताने वातावरण भारावून गेले. संस्थेचे अध्यक्ष मोतीराम विश्वासराव, कार्याध्यक्ष सहदेव सावंत, तसेच उपकार्याध्यक्ष गणपत तावडे, अशोक परब, सरचिटणीस जितेंद्र पवार आणि खजिनदार विनोद बने यांनी मान्यवरांचे शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

शिक्षकांच्या योगदानाचा विशेष गौरव

बालविकास विद्यामंदिरच्या सहा दशकांच्या यशस्वी वाटचालीत शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत आणि शाळेच्या प्रगतीत सातत्याने योगदान देणाऱ्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांचा व सेवक वर्गाचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुविधा शिर्के, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल देसाई आणि माध्यमिक चे मुख्याध्यापक श्री. जगदीश सूर्यवंशी यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे उपमहापौर श्री संजय घाडी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षकांच्या व संस्थेच्या व्यवस्थापनाच्या कार्याचे कौतुक केले. मराठी माध्यमाच्या शाळांची सर्वत्र कठीण परिस्थिती असताना बालविकास शाळा केवळ टिकून नाही तर प्रगतीपथावर आहे याबद्दल उपमहापौरांनी गौरवोदगार काढले. त्यानी शाळेच्या प्रगतीसाठी महानगरपालिकेतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

‘मी बालविकासचा विद्यार्थी आहे, याचा अभिमान’

स्थानिक आमदार आणि बालविकास विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी अनंत उर्फ बाळा नर यांनी आपल्या मनोगतात शाळेशी असलेले भावनिक नाते उलगडले. शाळेच्या सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी, “आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च विधानभवनात मी बालविकासचा विद्यार्थी म्हणून उभा आहे, याचा मला अभिमान वाटतो,” अशी भावना व्यक्त केली.

नगरसेविका नाजिया अब्दुल जब्बार सोफी यांनी शिक्षकांचा सन्मान करून शाळेला हिरक महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य विजय जाधव यांची मुंबई सहकारी बोर्डवर संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

‘बालविकासची वाटचाल अशीच विस्तारत राहावी’

संस्थेचे कार्याध्यक्ष सहदेव सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानताना ते शाळेला नेहमीच सहकार्य करीत असल्याचे नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष मोतीराम विश्वासराव यांनी आपल्या मनोगतात गेल्या ६० वर्षांत संस्थेने अनेक अडचणींचा सामना करत बालविकास विद्यामंदिरची भक्कम पायाभरणी केल्याचे सांगितले.

आगामी काळात शाळेचा आणखी विस्तार होऊन आधुनिक शिक्षण, संस्कार, क्रीडा, कला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे सक्षम केंद्र म्हणून बालविकास विद्यामंदिरने नवी उंची गाठावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी पर्यवेक्षक निळे सर यांनी रचलेले ‘गौरव गीत’ सर्व शिक्षकांनी सामूहिकरित्या सादर केले. या भावपूर्ण सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. अखेर ‘राष्ट्रगिताने हीरक महोत्सवी सोहळ्याचा दिमाखदार समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सक्रिय सभासद श्रीमती नम्रता भोसले यांनी केलं तर आभार प्रशासकीय अधिकारी यशवंत साटम यांनी मांडले.या कार्यक्रमाला आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल चे सीईओ दिपक खानविलकर, प्रिन्सिपॉल डींपल दुसाने, प्रायमरी च्या प्रिन्सिपॉल शबनम, संस्थेचे उपखजिनदार विजय खामकर,का.सदस्य मंगेश पंडित, सुहास बने,उमेश कदम, विजय जाधव,सुशिल चव्हाण, सौ. इंद्रायणी सावंत,सल्लागार एकनाथ दळवी व प्रमोद पंडित उपस्थित होते.

सहा दशकांची परंपरा, हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचे कार्य आणि भविष्यातील उज्ज्वल वाटचालीचा संकल्प अशा त्रिसूत्रीने बालविकास विद्यामंदिरचा हीरक महोत्सव शुभारंभ समारंभ एक अविस्मरणीय पर्व ठरला.