२०२२-२०२३ या वर्षात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई संस्थेचा हिरक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे ही फार अभिमानास्पद बाब आहे. या संस्थेने चालविलेली बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी (पूर्व) ही जागतिक शहर असलेल्या मुंबई उपनगरातील एक अग्रगण्य शाळा आहे आज मी जिथे येऊन पोहोचलो आहे. त्यावरून माझी परीक्षा करू नका, तर मी कोठून आलो आहे ते लक्षात घ्या.
एका दुर्गम खेडेगावात माझा जन्म झाला, बालपणात कधीच पायात चप्पल किंवा बूट घालायला मिळाले नाहीत, कॉलेजला गेल्यावर पहिल्यांदाच चप्पल घालणारा मी या शाळेच्या मुख्याध्यापक होण्याचे भाग्य लाभले याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
मी या शाळेत जुलै १९९५ मध्ये सहशिक्षक म्हणून रुजू झालो तो दिवस मी कदापीही विसरू शकत नाही. त्यावेळी शाळा बैठी चाळ होती तर वर्ग खोल्या पत्र्याच्या होत्या. अशा शाळेचे रुपांतर एका सुसज्ज इमारतीत झालेले आहे. याचे मुख्य करण म्हणजे संस्थेच्या आजपर्यंत च्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांची दूरदृष्टी, मेहनत, त्याग आणि जिद्द त्याच बरोबर माजी मुख्याध्यापक मा. चोगले सर, सौ. खामकर मॅडम, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या सकारात्मकतेचे हे फळ आहे. असे एक एक करून अनेकजण एकत्र केले आणि त्यातूनच हा वटवृक्ष दिमाखात उभा आहे.
I can do thing, you can not
You can do things I can not
But together we can do great things हे सार्थ ठरेल.
संस्था प्रमुखांनी काळाची गरज ओळखून RJMDS’s इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली आणि सतत १००% निकालाची परंपरा कायम सुरु आहे. पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध उपक्रम संस्थेतर्फे शाळा राबवत आहे जसे NTS, NMMS शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, ज्ञानपीठ , होमी भाभा, बालवैज्ञानिक, चित्रकला, ग्रेड परीक्षा, विविध क्रीडा खेळ, लेझीम, मल्लखांब, कराटे, योगा, नाट्य, संगीत, विज्ञान प्रदर्शन हस्तकला, रांगोळी प्रदर्शन इत्यादी राष्ट्रीय सण, समारंभ, महापुरुषांच्या जयंत्या, व्याख्याने, परिसंवाद इत्यादीचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जातो, त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
शाळा एक समाज आहे त्यासाठी शाळेत पालकांसाठी वाचनालय उपलब्ध करून दिलेले आहे. त्यातून वाचन पेटी, वाचक – बालक – पालक ही संकल्पना मूळ धरत आहे. आदर्श माता सन्मान पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श विद्यार्थी सन्मान करून गौरविण्यात येते, त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना प्रोत्साहन मिळत आहे. शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्मार्ट क्लासरूम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थायांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
एखादा संत दीप लावून जातो
त्याचा प्रकाश
अंधारातून वाट काढणाऱ्या जीवांना ……
मार्ग दाखवित राहतो!
अशा सदगुणी कार्यकारी मंडळानी बहुजनांच्या लेकरांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली आहेत. त्यांच्या हातात शिक्षणाचा दीप देवून प्रकाशाच्या वाटेवर चालण्याची चेतना निर्माण करत आहेत. भविष्यात संस्थेचे एक प्रचंड मोठे शैक्षणिक संकुल उभे राहून त्यात स्वच्छंदी, स्वाभिमानी, राष्ट्राभिमानी, उद्योजक, व्यावसायिक , तंत्रज्ञ, वैज्ञानिक, समाजसेवक निर्माण होऊन एकाच बागेत विविध रंगीबेरंगी फुले फुललेली पाहायला मिळतील याची मला खात्री आहे. त्यासाठी संस्थेच्या आणि शाळेच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!