सौ. सुविधा हरीचंद्र शिर्के

मुख्याध्यापिका – पूर्व प्राथमिक विभाग           

स्मृतींची फुले 

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित बाल विकास विद्या मंदिर ही शाळा मी कु. सुरेखा अनंत मावळंकर आताची सौ. सुविधा ह शिर्के यांचे बालपणापासूनचे घनिष्ठ नाते आहे. माझे इयत्ता ४ थी पर्यंत चे शिक्षण याच शाळेत मुख्याध्यापिका सौ. मुळये बाई, सौ. श्रद्धा सावंत बाई सौ. स्मिता चव्हाण बाई, यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. मला अजूनही शाळेचे दिवस आठवतात शाळेत कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी पताक्यांची  सजावट करत असू, छान छान रांगोळी काढली जाई. सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा हस्तलिखित असो मी त्यामध्ये सहभागी होत असे. त्यावेळी आपली शाळा- ४थी पर्यंतच असल्यामुळे पुढील शिक्षण अरविंद गंडभीर हायस्कूलमध्ये झाले.

सहाजिकच शाळेचे संस्थापक कै. प्र. रा. विश्वासराव ( रावगुरुजी), कै. वि. ना. शिंदे (भाऊ), कै. द. गो. पालकर गुरुजी या त्रिमूर्तींना लहानपणापासून मी अगदी जवळून पाहिलेले आहे.

जून १९८८ मध्ये या शाळेत भाऊ, रावगुरुजी व शिंदेबाई  यांनी माझी नेमणूक पूर्व प्राथमिक विभागात शिक्षिका म्हणून केली. त्यावेळी विद्यार्थांची संख्या खूप होती. प्रवेशाच्या आधी २ दिवस पालक रांगा लावत तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसे त्यामुळे मग नेते मंडळींच्या मंत्र्याच्या चिठ्या आणत व तरीही जागे अभावी काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्यामुळे पालक नाराज होत असत.

प्रवेशाच्या दिवशी कै. भाऊ, कै. रावगुरुजी तसेच त्यांचे सहकारी कै. द. गो. कदम, कै. वि. ब. तावडे, श्री. म. पा. विश्वासराव, श्री. ज. य. विश्वासराव, श्री. दळवी सर ही सर्व मंडळी उपस्थित राहत असत. आलेल्या प्रवेश अर्जांची वयोगटाप्रमाणे विभागणी करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाई. काही दिवसानंतर मुलाखतीद्वारे प्रवेश घेणे चालू होते. त्यावेळी तर सकाळी ८ वाजता कामकाज चालू व्हायचे ते रात्री नऊ / दहा वाजेपर्यंत काम पूर्ण करूनच घरी जात असू.

जून मध्ये शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांना बघण्यासाठी येत असत. वर्गात येवून विद्यार्थ्यांना नाव विचारत. काही विद्यार्थी रडत असत. त्यांना वर्गशिक्षिका शांत कशा करतात हे पाहत. शिकविताना सुद्धा वर्गात येऊन उभे राहत.

वेळोवेळी पालकसभा घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल पाहिला जाई. हस्ताक्षराकडे तर रावगुरुजींचे कटाक्षाने लक्ष असे. परीक्षा झाली की कमिटीतील सर्व पदाधिकारी ते सर्व उत्तरपत्रिका पाहत असत. विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका वर्गशिक्षिकेला  दाखवून त्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा तशी चूक होऊ नये याची काळजी घेण्यास सांगत. हे सर्व पाहून मी या विद्यार्थ्यांमध्येच रमून गेले.

मुख्याध्यापिका शिंदेबाईं, रावबाई, काळेबाई, सांडेबाई, बनेबाई या सहशिक्षिका व पांगेमाई, मोरेमाई, या सेविका म्हणून कार्यरत होत्या.

पूर्व प्राथमिक विभागात लिपिक नसल्यामुळे सर्व कामे शिक्षिका स्वत: करत व अजूनही करतात. कमिटीतील सर्व पदाधिकारी सुट्टीच्या दिवशी तर शाळेच्या कामात मग्न असत. मी सुद्धा काही वेळेला सुट्टीच्या दिवशी त्यांच्या बरोबर उपस्थित राहत असे. आमच्या विभागाचा जमाखर्च न चुकता कसा लिहायचा ते मी श्री. माधवसरांकडूनच शिकले.

शाळेच्या प्रगतीसाठी सर्व शिक्षकांना नामांकित शाळेत पाठवून अभ्यासाविषयी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी काही माहिती मिळवता आली तर त्यासाठी प्रयत्न केले जात.

आमचा पूर्व प्राथमिक विभाग हा शासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित असल्यामुळे मुख्याध्यापिका शिंदेबाई पासून सर्व शिक्षिका व सेविका यांनी संस्थेद्वारे मिळणाऱ्या अगदी अल्प वेतनात काम करून आपली शाळा माझी शाळा असे समजून काम केले आहे. आम्ही देणगी रूपाने काही देऊ शकलो नाही परंतु आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेला वेळ व केलेले काम हिच मोठी देणगी संस्थेसाठी व शाळेसाठी ठरेल असे मला वाटते.

विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल व शिक्षकांच्या आवडलेल्या कामाबद्दल रावगुरुजींची  शब्बास! छान!  ही पोचपावती मिळायची ती मी कधीही विसरू शकणार नाही.

बाल विकास विद्या मंदिर (पूर्व प्राथमिक विभाग ) आमच्या  शाळेत वर्गखोल्या दोन असून विद्यार्थ्यांची पटसंख्या ५५ आहे. पूर्व प्राथमिक विभागात सगळे सण साजरे केले जातात. त्यातूनच  बालमनावर आपली संस्कृती, परंपरा व मूल्ये रुजवली जातात. सन २०२४-२५ सालात संस्कृत श्लोक पाठात १४ विध्यार्थी स्पर्धेला गेलेली. ८ विद्यार्थाची निवड झाली.

विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले की शालेय कमिटीचे सर्व पदाधिकारी अगदी  आवडीने उपस्थित राहत असत. पाहुण्यांची ओळख कशी करून देणार याची रंगीत तालिम शिक्षिकांकडून भाऊ स्वत: करून घेत असत. आम्हाला वेळ नाही तुम्हीच करून घ्या हे शब्द आम्ही त्यांच्या कडून कधीच ऐकलेले नाहीत.

मुख्याध्यापिका शिंदेबाई निवृत्त झाल्यानंतर सौ. भावसारबाई मुख्याध्यापक पदावर तीन वर्ष होत्या. त्यांच्यानंतर सौ. शिंदेबाई यांनी २ वर्षे मुख्याध्यापिका म्हणून काम पहिले व त्यांच्या निवृत्तीनंतर सौ. बनेबाई यांची नेमणूक मुख्याध्यापिका म्हणून झाली त्यांचेही विद्यार्थ्यांच्या अक्षर लेखनाकडे, कलागुणांकडे जास्त लक्ष असे. विद्यार्थ्यांना खाऊ बनवून वाटायचा असेल तर त्यांची खूपच घाई असे. तो पदार्थ व्यवस्थित, छान कसा करता येईल याकडे त्या पूर्ण लक्ष देत असत. शिंदेबाईं पासून मुलांना खाऊ बनवून देण्याची परंपरा अजूनही चालू ठेवली आहे.

मी स्वत: सौ. सुविधा हरीचंद्र शिर्के या शाळेची विद्यार्थिनी, पालक, शिक्षिका व मुख्याध्यापिका या सर्व भूमिका पार पाडल्यामुळे म्हणजेच सागरात  पोह्ण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची ही संधी नव्या क्षितीजांना साद घालताना जुन्या क्षितीजांना अभिवादन करणे त्यांचे आशीर्वाद घेणे हिच आपली संस्कृती. या संस्कृतीची पाईक असणारी मी ही स्मृतीची फुले मनात साठवत माजी विद्यार्थिनी म्हणून व पूर्व प्राथमिक विभागाची मुख्याध्यापिका म्हणून ज्ञात अज्ञात व्यक्तींना अभिवादन करते व शाळेची उत्तोरोत्तर प्रगती होवो हिच  शुभेच्छा देते.